महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ जून । महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर झाली असून याच पार्श्वभूमीवर आता भारतीय जनता पार्टीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपाने पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे या वादात उडी घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आलाय.
भाजपाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल कोश्यारी यांना पक्षाच्यावतीने हे पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये भाजपाने महाविकास आघाडी सरकार राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाल्याने घाईघाईत शासन आदेश जारी करत असून यासंदर्भात संशय घेण्यास वाव असल्याचं म्हटलंय. ज्या वेगाने शासन आदेश जारी केले जात आहेत ते पाहता यामध्ये राज्यपालांनी लक्ष घालावं अशी मागणी भाजपाने केलीय.
सध्याची राज्यातील स्थिती पाहता हस्तक्षेप करावा अशी मागणी राज्यपालांकडे भाजपाने केली आहे. अस्थिर स्थिती पाहून महाविकास आघाडी सरकार अंदाधुंद निर्णय घेत आहे असा आरोप भाजपाने राज्यपालांना पाठवलेल्या या पत्रामधून केलाय. घाईघाईनं शासन आदेश जारी होत आहेत. यासंदर्भात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, असं दरेकर यांनी पक्षाची बाजू मांडताना म्हटलंय. राज्यातील राजकीय स्थिती तीन दिवसांमध्ये अत्यंत अस्थिरतेची झाली आहे. दोन दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारने १६० हून अधिक शासन आदेश काढलेले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली काढलेले जीआर संशय वाढवणार आहेत, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.