सध्याची वेळ आव्हानात्मक भाषा वापरण्याची नाही – आमदार भास्कर जाधव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ जून । “सध्याची वेळ आव्हानात्मक भाषा वापरण्याची नाही, तर ‘भूला हुवा शाम घर आया, तो उसे भूला नहीं कहते’ म्हणण्याची आणि कृतीमध्ये उतरविण्याची वेळ आहे. त्या दृष्टीने संवादात्मक भाषेचा अवलंब करावा.”, असा सल्ला माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना नेत्यांना दिला आहे.

शिवसेनेचे पक्षप्रवक्ते संजय राऊत यांनी, बंडखोर एकनाथ शिंदे गटाला उद्देशून ‘मुंबईत येऊन आमच्यासोबत बसा’, असे ट्वीट केले होते. तसेच आव्हानाची भाषा वापरली होती. त्यामुळे पेचप्रसंगावेळी काय भूमिका असावी, कशारितीने नाराजांशी संवाद साधावा यावरून शिवसेनेत भिन्न मतप्रवाह असल्याचे आणि नाराजांबाबत आव्हानात्मक भाषेऐेवजी संवादाची भाषा वापरण्याची अनेकांची इच्छा असल्याचे समोर आले आहे.

“संजय राऊत आमचे मुख्य प्रवक्ते आहेत. त्यांना सल्ला देण्याइतका मी मोठा नाही. तरीही त्यांना नम्रपणे विनंती करेन की, ही वेळ आव्हानात्मक भाषा वापरण्याची नाही. आव्हाने – प्रतिआव्हाने देऊन हा प्रश्न सुटणार नाही. घटनात्मक तरतुदींचा आधार घ्या. त्याचबरोबर संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे. आव्हानात्मक भाषा वापरण्याऐवजी संवादात्मक भाषा वापरू या, जोडण्याची भाषा वापरू या. आपली माणसे आहेत. ती आपल्या जवळ येण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू या.”, असे भास्कर जाधव म्हणाले.

त्याचबरोबर सध्या शेतीच्या कामांसाठी कोकणात गावाकडेच राहणार आहे. पण गरज पडल्यास व पक्षाने बोलवल्यास मुंबईत पोहोचणार असल्याचेही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *