महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ जून । शिवसेना खासदार संजय राऊत बंडखोरांना राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलंय. इतकेच नव्हे तर, कायम शिवसेनेशी उभा दावा सांगणारे नारायण राणे यांना आपण एका गोष्टीसाठी मानतो असेही संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
“बंडखोर आमदार उगाचच खरी शिवसेना, खोटी शिवसेना असं बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत. जे शिवसेनेतून फुटले आणि बाहेर पडले त्यांची शिवसेना असूच शकत नाही. जनता ठरवेल की कोणाची भूमिका योग्य आहे. तुम्हा सर्वांच्यात जर धमक असेल तर तुम्ही तुमच्या आमदारकीचा राजीनामा द्या आणि आपापल्या मतदारसंघात निवडणूक लढवा. त्यातून स्वत: जिंकून दाखवा. या एका गोष्टीसाठी मी नारायण राणेंना मानतो. त्यांचा गट लहान होता, पण तरीही त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर आमदारकीचे राजीनामे दिले आणि ते पुन्हा निवडणूक लढले”, अशा शब्दांत त्यांनी नारायण राणे यांच्याबद्दलचे विधान केले.
बंडखोर आमदारांनी थेट निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी दाखवा. ज्योतिरादित्य शिंदेच्या सोबत ज्या आमदारांचा गट बाहेर पडला, त्यांनी निवडणूक लढवून जिंकून सत्तास्थापना केली. तशी धमक तुमच्यात दिसली पाहिजे. हिंमत असेल तर ५४ च्या ५४ आमदारांनी राजीनामे द्यावे आणि आपल्या मतदारसंघातून निवडणुका लढवण्याची हिंमत दाखवावी हे माझं सर्व बंडखोरांना खुलं आव्हान आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.