महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ जून । शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी सहा दिवस झाले तरी वेगळा गट स्थापन केला गेला नाही. तसेच भाजपमध्येही (bjp) प्रवेश केला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपनेही अद्याप आपले पत्ते उघड केले नाहीत. भाजप आपले पत्ते उघड करायला अजून थोडे दिवस घेईल असं सांगितलं जात आहे. शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही प्रस्ताव आलेला नाही, हे त्यामागचं कारण आहे. शिवाय शिंदे गटाच्या बंडानंतर कायदेशीर लढाई सुरू होणार आहे. अशावेळी आमदार शिंदे यांच्यासोबत राहतील की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपने आस्ते कदम जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं दिसतंय . मागील अनुभवातून भाजप ताकही फुंकून पिताना दिसत असल्याचं सांगितलं जातंय.
एकनाथ शिंदे गटाकडून गटनेते पदासाठी कोर्टात धाव घेतली जाणार आहे. तसेच आमदारांना आलेल्या निलंबनाच्या नोटिशीवरही कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. शिवाय उपसभापतींवर अविश्वास ठराव आहे. त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचे किती अधिकार आहेत, यावरही शिंदे गटाकडून कोर्टात दाद मागितली जाणार आहे. कोर्टात या प्रकरणावर किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. कोणताही निर्णय कोर्टातून आला तरी त्याला सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल. त्यातही वेळ जाणार असल्याने भाजपने वेट अँड वॉचचं धोरण स्वीकारल्याचं साांगितलं जात आहे.
भाजप शिंदे गटाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे शिंदे गटाकडे किती आमदार आहेत, ते किती दिवस चालेल याकडे भाजप लक्ष ठेवून आहे. शिंदे यांच्याकडून प्रस्ताव आला नसल्यानेही भाजपने आस्ते कदम जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
शिंदे गटाने बंड केल्यानंतर तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं चित्रं जोपर्यंत निर्माण होत नाही, तोपर्यंत भाजप कोणतीही हालचाल करणार नसल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेना भाजपनेच फोडली ही जनमानसात भावना निर्माण होऊ नये, हे या मागचं कारण आहे. कारण आता महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत कोणतंही नुकसान होऊ नये म्हणून भाजपने सबुरीने जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे.
यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केलं होतं. पण अजित पवार यांचं बंड अल्पकाळाचं ठरलं होतं. त्यामुळे भाजपची नाचक्की झाली होती. भाजप सत्तेला हपापलेला असल्याचं चित्रं जनतेत उभं राहिलं होतं. आताही तेच चित्रं निर्माण होऊ नये म्हणून भाजपने खबरदारी घेतली आहे. शिंदे यांचं बंड किती यशस्वी होतंय. त्यांच्यासोबत किती आमदार राहतात आणि कायदेशीर प्रक्रियेतून शिंदे गट सहिसलामत बाहेर पडतो का? या सर्व गोष्टी पाहूनच भाजप पुढचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.