ठणठणीत बरे झालेल्यांचा आकडा मोठा आहे त्याला देखील योग्य प्रसिद्धी दिली गेली पाहिजे ; राज ठाकरे

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन : मुंबई कोरोनातून ठणठणीत बरे झालेल्यांचा आकडा मोठा आहे त्याला देखील योग्य प्रसिद्धी दिली गेली तर नागरिकांचा आपल्या डॉक्टरांवरचा, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास अधिक वाढेल. सातत्याने भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या नागरिकांना देखील काहीसा दिलासा मिळेल. अर्थात आजार नियंत्रणात आहे हे दाखवलं गेलं तर नागरिक लगेच बाहेर पडतील असा जर समज असेल तर तो चुकीचा आहे आणि ३ मे पर्यंतच्या लॉकडाऊनच लोकं पालन करतील ह्याविषयी शंका नाही, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.

एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे किंवा तशी शक्यता आहे असं जरी आढळलं तरी त्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार समोर येत आहेत. हा प्रकार चुकीचा तर आहेच पण तो आपल्या सर्वांना नुकसानकारक ठरेल. ह्या आजाराच्या नुसत्या शंकेने सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार घडत असतील तर लोकांचा कल त्याची लक्षणं लपवण्याकडे राहील आणि पर्यायाने लॉकडाऊनसकट केलेल्या अनेक उपाययोजना निष्प्रभ ठरतील. हा आजार संसर्गजन्य आहे हे मान्य पण टी.बी. सारखे अनेक आजार हे संसर्गजन्य असताना देखील आपण त्या रुग्णांना वाळीत टाकलं नाही तर आत्ताच हे का? असा सवालही राज यांनी केला आहे.

ह्यावर एकच उपाय म्हणजे ह्या आजारावर मात केली जात आहे, रुग्ण ठणठणीत बरे होऊन बाहेर पडत आहेत ह्याचे आकडेवारी देणारं एक ‘न्यूज बुलेटिन’ आठवड्यातून एकदा सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारने जारी करावं. माध्यमांनी देखील ह्या मुद्द्याच गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *