महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ जून । ठाकरे कुटुंबीयांची नारायण राणे यांनी बदनामी केली. ते तेव्हा भाजपात होते का? तुम्ही त्यांच्यावर टीका केली, म्हणून त्यांनी बाहेरून एक माणूस घेतला. तुमचे जर चांगले संबंध होते, तर तुम्ही भाजपाच्या नेत्यांना जाऊन या माणसाला थांबवा असे सांगायला हवे होते. अॅक्शनला रिअॅक्शन होते, अशा शब्दांत शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना ऐकवून दाखविले. तसेच आम्ही तुमच्या निर्णयाची वाट पाहतोय, असेही म्हणाले.
शिवसैनिक जे रस्त्यावर उतरविले जात आहेत, त्यामध्ये तरुणही आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर त्यांना पासपोर्ट, नोकरी मिळू शकणार नाही. कशाला हे उद्योग करताय. शरद पवार माझ्याशी चांगले आहेत. त्यांच्यावर आमचा विश्वास होता. राष्ट्रवादीचे राज्यातील प्रदेशाध्यक्ष त्यांचा उमेदवार पडलेल्या मतदारसंघात जातात, तिथे शिवसेनेचा उमेदवार पाडण्याचे बोलतात. त्यांना ताकद देतात, त्यामुळे सरकार स्थापन केल्यावर जो विश्वास होता, तो उडाला. आमच्या मनात खदखद निर्माण झाली, असा आरोप केसरकर यांनी केला.
बहुमत प्रस्तावावर उद्धव ठाकरेंविरोधात कोण मतदान करेल? ते आमचे नेते आहेत. आम्ही सर्व ५१ आमदार त्यांना मतदान करू. १५-२० आमदारांचे काय घेऊन बसला. तुम्ही वरिष्ठ आहात, त्यामुळे तुमचा मान ठेवून आमदार फोन उचलत आहेत. तुमच्यासोबत येणाऱ्यांची आम्हाला नावे सांगा. सन्मानाने मुंबईत आणून सोडतो, असेही केसरकर म्हणाले.
तुमची सत्ता जाऊ नये म्हणून शिवसेना संपविणार आहेत का? ते लोक शिवसेनेसाठी मतदान मागण्यास जाणार का? आम्ही जाणार ना, शिंदे हे आमचे नेते आहेत, त्यांना तुम्हीच आमचे नेते बनविलेले. घटनेच्या विरोधात कायदा बनू शकत नाही, पासवान केसमध्ये काय झाले. आम्ही दबावाला बळी पडणार नाही, असे केसरकर यांनी म्हटले. उद्या आम्ही शांत बसणार नाही. आदरालादेखील मर्यादा आहेत, असा इशाराही केसरकर यांनी राऊतांवरून दिला.
उद्धव ठाकरेंनी आता त्यांना मान राहिल असा निर्णय घ्यावा, आम्ही त्यांची वाट पाहतोय, असे आवाहनही केसरकर यांनी दिले.