महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ जून । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनच्या बंडखोर एकनाथ शिंदे गटातील आमदार आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि संजय राऊत हे जबाबदार आहेत.
दीपक केसरकर म्हणाले, हा राजीनामा आमच्यासाठी आनंदाची गोष्ट नाही. ही आमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे. जो संघर्ष आम्हाला करावा लागला याला पूर्णपणे जबाबदार काँग्रेस, राष्ट्रवादी आहे आणि त्यापेक्षा जास्त जबाबदार हे संजय राऊत आहेत. रोज उठायचे आणि काहीतरी टीका करायची. असे करून त्यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये एक दुरी निर्माण केली. ज्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर झाला. आमचे मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेस संपवायला निघाली होती. गेल्या काही वर्षांत आमची उद्धव ठाकरेंशी व्हावी तशी भेट झाली नाही. महाराष्ट्राच्या जनतेशी दगाबाजी कुणी केली हे सर्वांनाच माहीत आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिंदे गटाकडे आता ३९ आमदार आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे १६ आमदार आहेत. बहुमत आमच्याकडे आहे. १६ आमदारांनी आमचा व्हीप मान्य केला नाही तर त्यांना आम्ही अपात्र करू शकतो, असेही दीपक केसरकर म्हणाले. उद्धव ठाकरेंनी अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड केली आहे, तर सुनील प्रभू हे मुख्य प्रतोद असतील. त्यामुळे उरलेल्या १६ जणांना आता एकनाथ शिंदे यांचे ऐकण्याशिवाय पर्याय नाही.