महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ जुलै । ‘माउली… माउली… असा गगनभेदी घुमणारा आवाज… लाखो वारकऱयांच्या लागलेल्या एकसारख्या नजरा अन् रोखलेला श्वास… अशा भारलेल्या वातावरणातून वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींचा आणि स्वाराच्या अश्वांनी केलेल्या नेत्रदीपक दौडने लक्ष-लक्ष नेत्रांचे पारणे फेडले. वरुणराजाच्या हजेरीत श्रीसंत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण फलटण तालुक्यातील चांदोबाचा लिंब येथे गुरुवारी (दि. 30) सायंकाळी पार पडले.
लोणंद येथील अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर श्रीसंत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा गुरुवारी दुपारी खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश करण्यासाठी मार्गस्थ झाला. या पालखी सोहळ्याचे तालुक्याच्या सीमेवर सरदेचा ओढा येथे फलटण तालुक्याच्या वतीने आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, जिल्हा परिषदचे सदस्य दत्ता अनपट यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे रिंगण सोहळा पाहाता न आल्याने वारकऱयांसह भाविकांना वेध लागले होते. त्यामुळे रिंगणस्थळी वारकऱयांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. हा सोहळा पाहाता यावा, यासाठी महिला भाविकांसह अनेक वारकरी आधीच गर्दी करून बसले होते.
दुपारी सव्वातीन वाजता माउलींचा पारंपरिक मानाचा नगारखाना आला. त्यानंतर काही वेळाने पालखी रथ मंदिरासमोर आल्यावर उपस्थितांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली गेली. यावेळी वैष्णवांच्या उत्साहाने सारा आसमंत भक्तिरसात चिंब झाला होता.
रिंगणस्थळी रिंगण लावून घेतल्यानंतर साऱयांचे डोळे गर्दीतून धावत येणाऱया अश्वांकडे लागले होते. चोपदारांनी हात उंचावून इशारा करताच दुतर्फा वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींचा आणि स्वाराचा अश्व एका पाठोपाठ धावत सुटले. रथापुढील आणि मागील दिंडय़ांपर्यंत धावत जाऊन अश्वांनी पुन्हा माघारी दौड घेत लक्ष-लक्ष डोळ्यांचे पारणे फेडणारी दौड वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण करताच उपस्थितांनी माउलींचा एकच गजर केला. त्यानंतर अश्वाच्या टापाची माती ललाटी लावत धन्य झाल्याची भावना व्यक्त केली. महिला भाविकांसह वारकऱयांनी फुगडय़ा, फेर धरत पारंपरिक खेळ करत मनसोक्त आनंद लुटला.
यावेळी अश्वाचा स्पर्श आणि पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. त्यानंतर मोठय़ा भक्तिभावाने डोक्यावर तुळशी वृंदावन, भगवी पताका घेत तरडगाव मुक्कामासाठी वारकरी मार्गस्थ झाले. शुक्रवारी आणि शनिवारी असा दोन दिवस माउलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम फलटण येथे असणार आहे.