महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ जुलै । कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरूवारी सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला होता. यानंतर पुढील चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला अलर्ट, तर कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मध्यरात्री मुंबईत पाऊस थांबला होता. मात्र सकाळी काही वेळातच पुन्हा पावसाला सुरुवात झाली.
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी आज मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. मुंबईचा पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, वांद्रे, कुर्ला, सायन, दादर, मुलुंड या सर्व परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे मुंबईच्या सखल भागामध्ये सर्व ठिकाणी पाणी भरले होते, मात्र मध्यरात्री पाऊस थांबल्यामुळे सखल भागांमधून पाणी निघून गेला आहे. आज पहाटे पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे,असंच जोरदार पाऊस सुरू राहिला तर पुन्हा मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात होणार आहे.
गुरूवारी मुंबईत सलग 12 तास पाऊस झाल्यानंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात पाणी साचले आहे. पहिल्यास मुसळधार पावसात मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील पावसाची आकडेवारी समोर आली आहे. मुंबईत सकाळी 8 ते रात्री 8.30 पर्यंत बारा तासात कुलाबा 176 मिमी पावसाची नोंद करण्यात आला आहे. मुंबईतील सांताक्रुज 137 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पुढील तीन ते चार दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार
दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं येत्या 3 ते 4 दिवसांत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या परिस्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.