विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम ठरला, ‘या’ दिवशी होणार मतदान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जुलै । राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे सरकारने कांजूरमार्गमधील मेट्रो स्टेशन पुन्हा आरेमध्ये आणण्याचा निर्णय घेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला मोठा धक्का दिलेला असतानाच दुसरीकडे नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनातच ही निवडणूक पार पडणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भात विधिमंडळ सचिवालयाकडून पत्रकच जारी करण्यात आलं आहे.

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त झालं होतं. तेव्हापासून उपाध्यक्ष नरहरी झिरवळच अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होते. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक राजकीय अडथळे येत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. उद्धव ठाकरे सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची परवानगी देण्यासाठी राज्यपालांना विनंती करून देखील ही परवानगी देण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर आता नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सूत्र वेगाने हलू लागली असून तातडीने बोलावण्यात आलेल्या अधिवेशनातच ही निवडणूक घेण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *