Eknath Shinde Vs Shivsena : शिवसेनेचे बंडखोर आमदार 11 दिवसांनी राज्यात परतणार ; विमानतळावर स्वागताची जय्यत तयारी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपद निवड आणि सोमवारी होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत येत आहेत. गोव्यातून हे आमदार निघाले असून सव्वा तासामध्ये मुंबईत येणार असून त्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी तदडा बंदोबस्त ठेवला आहे.

तब्बल 11 दिवसांनंतर शिंदे गटाचे आमदार हे मुंबईत दाखल होत आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज डोमेस्टिक एयरपोर्ट च्या गेट क्रमांक 9 मधून ते बाहेर पडतील. त्या ठिकाणी आता ढोल ताशे आणण्यात आले असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच या मार्गावर शेकडोच्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आमदार ज्या मार्गाने जाणार त्या मार्गावर विशेष कॉरिडॉर पोलिसांनी केला आहे. तीन विशेष बसच्या माध्यमातून हे आमदार एयरपोर्टमधून बाहेर येतील.

गोव्यातून बंडखोर आमदार मुंबईत येत असल्याने मुंबई पोलीस सतर्क असून सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलीस गिरगांव चौपाटीजवळ रस्त्यावर कोणतेही वाहन उभे करू देत नाहीत. कारच्या क्रमांकाच्या मदतीने ते मालकांशी संपर्क साधून त्यांना कार काढण्यास सांगत आहेत. या बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचे सर्व कर्मचारी गस्त आणि राऊंडअपवर आहेत. त्यासाठी मुंबईत एअरपोर्ट ते ओबेरॉय हॉटेलपर्यंत जागोजागी रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *