![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । लोणावळा-खंडाळा परिसरात सध्या रिमझिम पाऊस सुरू असून, वर्षाविहार व पर्यटनासाठी पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. लोणावळा व खंडाळा परिसरात निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पुणे-मुंबईतील पर्यटकांनी आज मोठी गर्दी केली होती. यामुळे लोणावळ्यातील वाहतुकीवर मोठा ताण आल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली.
पोलिस कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलिस यंत्रणेवर मोठ ताण आल्याने त्यांची त्रेधा उडाली. लोणावळा व खंडाळ्यासह मावळातील दुर्गम भागातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी तसेच वर्षाविहारासाठी लोणावळा परिसरास पर्यटकांची कायम पसंती असते. महाविद्यालयीन युवक-युवतींसह अबाल वृद्धांची लोणावळा परिसरातील भुशी धरण, लायन्स पॉइंट, खंडाळा येथील राजमाची पॉइंट येथे वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी गर्दी होत आहे.
याचबरोबर एकवीरा देवी गड व लेणी परिसर, भाजे लेणी, लोहगड, राजमाची, पवनाधरण परिसरासही पर्यटकानी पसंती दिल्याने मोठी गर्दी झाली. गेली दोन वर्षे कोरोनामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडल्याने हिरमोड झाला होता. सध्या पर्यटकांच्या संख्येमुळे लोणावळा-पुणे लोकलगाड्यांनाही गर्दी पहावयास मिळत आहे. दरम्यान पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतुकीवर प्रचंड ताण आला होता. भुशी रस्ता, बाजारपेठ, खंडाळा, पुणे-मुंबई महामार्गावरील अपोलो गॅरेज, महावीर चौक, गवळी वाडा, हॉटेल कैलास पर्वतपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतेक पर्यटक खरेदी करताना आपली वाहने दुकानांसमोर उभी करत असल्याने कोंडीत अजून भर पडत होती. त्यामुळे वाहने कोंडीत अडकल्याने पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांच्या मात्र नाकीनऊ आले.
