राज्य सरकारची बदनामी होऊ देऊ नका; अजित पवारांचं पालकमंत्र्यांना पत्र

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई: करोना संकटकाळात गोरगरीब जनतेला रेशन दुकानांतून दिल्या जाणाऱ्या धान्यवाटपाचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे, या वाटपात गैरप्रकार होऊ नये, धान्यवाटप सुरळीत, विनातक्रार व्हावं, वाटपाबाबत कुठलीही तक्रार आल्यास तिचं तात्काळ निराकरण करावं आणि शासनाची विनाकारण होणारी बदनामी टाळावी, यासाठी सर्वं पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तिश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना पत्र लिहून केलं आहे.

रेशन दुकानांमधून पुरेसं अन्नधान्य उपलब्ध केलं जात असतानाही तक्रारी वाढत असल्याकडे पवारांनी लक्ष वेधलं आहे. शासनाने रेशनिंगसाठी उपलब्ध केलेल्या धान्यसाठ्याची माहितीही त्यांनी पत्रात दिली आहे. ‘राज्यातील रेशनिंगवरील अन्नधान्याचा कोटा ३.८७ लाख मेट्रीक टनांवरून ७.७४ लाख मेट्रीक टनांवर नेण्यात आला आहे. केसरी कार्डधारकांना १.५२ लाख मेट्रीक टनांचं अतिरिक्त धान्य उपलब्ध करून देण्यात आलं आहे. गरीब नागरिकांना पुरेसं धान्य मिळावं, कुणीही उपाशी राहू नये याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

शिधावाटप यंत्रणेसंदर्भातील सूचना व तक्रारींसाठी राज्य शासनाने राज्यस्तरावर १८००२२४९५० आणि १९६७ हे टोल फ्री दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. त्यावर संपर्क साधून सूचना द्याव्यात, तक्रारी दूर कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *