महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विश्वासमत ठराव जिंकला, याकरिता ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष मदत केली त्यांचे आणि अदृश्यपणे मदत केली, त्यांचेही आभार, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लगावला. यानंतर सभागृहात (Maharashtra Assembly) एकच हशा पिकला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत बहुमत चाचणीवेळी 164 मतांनी विश्वासमत ठराव जिंकला. यावेळी भाजप आणि शिंदेसेनेतील सर्व आमदारांनी त्यांचं अभिनंदन केलं. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाच्या प्रस्तावाचं भाषण केलं. एकनाथ शिंदे यांच्या निष्ठेचं तसेच त्यांच्या संघटनकौशल्याचं आणि जनतेप्रती सेवाव्रती असण्याचं त्यांनी यावेळी कौतुक केलं. यासोबतच उपमुख्यमंत्री पद मिळाल्यावर देवेंद्र फडणवीस यांना ज्यांनी ज्यांनी टोमणे मारले, त्या सर्वांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
‘अदृश्य हातांचेही आभार’
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभिनंदनाच्या प्रस्तावाचे भाषण करतानान म्हणाले, ‘ शिवसेना भाजप युतीचे आमचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला याबाबत मी शिंदे यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. (यानंतर शिवसेना भाजप युतीचा विजय असो, अशी घोषणाबाजी करत शिंदे सर्मथकांकडून जल्लोष करण्यात आला.)
सभागृहाबाहेर राहून हा प्रस्ताव मंजूर करण्यात ज्यांनी मदत केली, त्या अदृश्य हातांचेही मी आभार मानतो, असे वक्तव्य त्यांनी केले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे विजय वडट्टीवार, आणि चव्हाण यांचे नाव उच्चारले… ते म्हणाले, वडेट्टीवार साहेब, चव्हाण साहेब.. आभार तर मानलेच पाहिजेत..’ एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात आहे असे उघड दिसतेच आहे. मात्र अजूनही काही अदृश्य शक्तींचा या कारस्थानात सहभाग आहे. यात काँग्रेसही सहभागी असल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे हा टोला काँग्रेसला होता की काय, अशी चर्चा सुरु आहे.