आमदार फुटले, आता खासदारही नाराज ? या खासदाराचे उद्धव ठाकरेंना पत्र

 145 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । आदिवासी समाजातील सक्षम आणि कर्तृत्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याविषयीचे पत्र शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेऊन त्यांना सादर केले.

या पत्रात खासदार शेवाळे यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या संवेदनशील सामाजिक आणि यशस्वी राजकीय वाटचालीची प्रशंसा केली. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षीय राजकारणाला छेद देत, महाराष्ट्राची कर्तृत्ववान महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावी, याच हेतूने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतिपदासाठी पाठिंबा दर्शविला होता. तसेच दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कर्तृत्वाचा आदर करत शिवसेनेने त्यांना पाठिंबा दर्शविला होता. हीच परंपरा कायम ठेवत, आदिवासी समाजातील एका कर्तृत्ववान महिलेचा सन्मान करण्यासाठी शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा आणि त्यासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना आदेश द्यावा,’ अशी विनंती खासदार शेवाळे यांनी पक्षप्रमुखांकडे केली.

राहुल शेवाळे यांच्या या पत्रामुळे आमदारांबरोबरच खासदारांमध्येही नाराजी असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे ११ खासदार नाराज असल्याचं बोललं जातंय. या ११ खासदारांनी भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केल्याचं बोललं जात आहे. यासोबतच हे ११ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचंही बोललं जातंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *