वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची आस; माउलींच्या रिंगणाला पावसाची साथ ; आज तिसरे रिंगण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ च्या जयघोषाने खुडूस येथे माउलींच्या पालखीचे रिंगण पार पडले. या रिंगण सोहळय़ास पावसाची साथ मिळाली. मात्र भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. दुसरीकडे तुकोबारायांच्या पालखीचे माळीनगर येथे उभे रिंगण संपन्न झाले. गुरुवारी माउलींची आणि सोपानदेव यांची बंधुभेट होऊन पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे. तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रवेश पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे राहणार आहे. आता भाविकांना सावळय़ा विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे.

माउलींच्या पालखीने माळशिरस येथून प्रस्थान ठेवून खुडूस फाटा येथे सकाळी पोहोचली. येथील मैदानावर माउलींच्या पालखीचे दुसरे रिंगण संपन्न झाले. भव्य मैदानावर भाविकांची गोलाकार गर्दी दिसून आली. हातात भगवी पताका, टाळ-मृदुंगाचा, हरिनामाचा जयघोष आणि रिंगण सोहळा पाहण्याची उत्सुकता भाविकांना लागली होती. रिंगणाच्या ठिकाणी माउलींची पालखी विराजमान झाली. त्या नंतर माउलींचे अश्व आले.

चोपदाराने इशारा करताच उपस्थित भाविकांनी बोला पुंडलिक वरदेचा जयघोष केला. टाळ-मृदुंग आणि माउली माउलीच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून निघाले. आणि अश्वाने गोल फेरी पूर्ण केली. रिंगण झाल्यावर काही वेळ पावसाने हजेरी लावली.

दुसरीकडे जगद्गुरू तुकारम महारज यांच्या पालखीने अकलूज येथून प्रस्थान ठेवले आणि पालखी माळीनगर येथे पोहोचली. या ठिकाणी उभे रिंगण पार पडले. तुकोबारायांचा नगारखाना त्या नंतर पालखी आणि पाठोपाठ अश्व आले.

दुतर्फा भाविकांनी रांगा लावल्या होत्या. विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात अश्वाने उभी दौड पूर्ण करून पालखीला नमस्कार करून रिंगण सोहळा संपन्न झाला. या नंतर खेळ खेळून भाविकांनी मनमुराद आनंद घेतला. या नंतर पालखी बोरगाव येथे मुक्कामी पोहोचली.

ठाकुरबुवा समाधी येथे तिसरे रिंगण : गुरुवारी पालखी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करून पिराची कुरोली येथे मुक्कामी असणार आहे. तर माउलींची पालखी वेळापूर येथून प्रस्थान ठेवून ठाकुरबुवा समाधी येथे तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे संत सोपानदेव यांची बंधुभेट करून भंडीशेगाव येथे मुक्कमी असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *