Rain Update : राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा ; पाहा हवामान विभागाचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । सोमवार संध्याकाळपासून मुंबईमध्ये पावसाचे तांडव सुरू झाले. दोन दिवस मुसळधार बरसल्यानंतर बुधवारी दुपारनंतर मुंबईत पावसाने जराशी उसंत घेतली. मुंबईकरांना दोन दिवसांनी काही वेळ सूर्यदर्शनही झाले. बुधवारी सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत सांताक्रूझ येथे ३१.८, तर कुलाबा येथे २४.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

मुंबईमध्ये जुलैच्या अवघ्या सहा दिवसांमध्ये सांताक्रूझ येथे ६३४.३ मिलीमीटर, तर कुलाबा येथे ४८१.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने पुन्हा एकदा शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. भारतीय हवामान विभागाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, कोकण विभागात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक पाऊस लांजा येथे ८२३ मिलीमीटर नोंदला गेला. पालघर (शेती) केंद्रावर या सहा दिवसांमध्ये ६५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल मुंबईच्या सांताक्रूझ केंद्रावर पावसाची नोंद झाली आहे.

पुढील पाच दिवसांमध्येही कोकण विभागात तसेच सह्याद्रीलगतच्या परिसरामध्ये पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये रविवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघरमध्ये शुक्रवारी पावसाचा जोर वाढून तुरळक ठिकाणी अती तीव्र मुसळधार पाऊस पडू शकेल. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार, तर तुरळक ठिकाणी अती तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकेल. नाशिकच्या घाट परिसरात पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा येथील घाट परिसरातही तुरळक ठिकाणी अती तीव्र मुसळधार पावसाची शक्यता पुढील दोन दिवसांसाठी वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *