महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । राजकारणात धक्कातंत्राचा अचूकपणे वापर करण्यासाठी प्रसिद्ध असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याकडून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एक नवा डाव खेळला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपने पाठबळ पुरवल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरुद्ध बंडखोरी करून ठाकरे सरकार पाडले होते. त्यानंतर भाजपकडे (BJP) जादा आमदारांचे संख्याबळ असतानाही मोदी-शाह जोडगोळीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले होते. या सगळ्यातून आगामी काळात शिवसेनेला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा डाव मोदी-शाह जोडगोळीने आखला आहे. यादृष्टीने आता मोदी-शाह यांच्याकडून आणखी एक डाव टाकला जाण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपकडून सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांना रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. (Former MP suresh prabhu may be BJP’s vice president election candidate)
Meeting Hon Home minister @AmitShah ji today. Very interesting exchange of ideas on several issues.@AmitShahOffice pic.twitter.com/vWXX2VBitH
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) July 7, 2022
माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या सुरेश प्रभू यांनी गुरुवारी रात्री दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी प्रभू आणि अमित शहा यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर सुरेश प्रभू यांनी अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो ट्विट केला होता. त्यामुळे भाजपकडून सुरेश प्रभू यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाऊ शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रभू यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला असून त्यांनी निवडणुकींच्या राजकारणातूनही निवृत्ती घेतली आहे. ते पूर्वी चार वेळा लोकसभेवरही खासदार होते. फेब्रुवारी महिन्यात सुरेश प्रभू यांनी आपण भविष्यात निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यांनी एका अर्थी राजकीय संन्यास घेतला होता.