महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला ‘मातोश्री’वर बोलावले तर नक्की जाऊ, पण आता आम्ही भाजपसोबत असल्याने ठाकरे यांना भाजपशीही चर्चा करावी लागेल आणि शिवसेना आमदारांच्या नाराजीसाठी कारणीभूत असणाऱ्यांना दूर करावे लागेल, असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले, अनेक लोक असे आहेत जे आम्ही काम घेऊन जात असू तेव्हा तो अर्ज आमच्याकडे द्या, आम्ही उद्धव ठाकरे यांना देतो असे सांगायचे. पण त्यासाठी आम्ही आमदार झालेलो नाही. मुख्यमंत्री आमचे प्रतिनिधी असतात. त्यांच्या हातात अर्ज दिल्यानंतर आम्हालाही योग्य व्यक्तीच्या हातात सोपवल्याचे समाधान मिळते. कोणीतरी एजंट मध्ये येऊन आमच्याकडे कागद द्या असे सांगत असेल तर त्याला अधिकार नाही. तो फक्त मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, असा टोलाही केसरकर यांनी लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ४० आमदारांनी घेतलेली भूमिका बंड नव्हे तर उठाव होता, असेही केसरकर यांनी नमूद केले.