हार्दिकच्या वादळात साहेबांचा धुव्वा ; पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर दणदणीत विजय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । इंग्लंडविरुद्ध (IND vs NEG) टी-20 मालिकेत भारताने विजयी सुरवात केली आहे. रोहित शर्माच्या संघाने रोझ बाउलमध्ये खेळलेला सामना ५० धावांनी जिंकला. हार्दिक पांड्या भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत चांगली कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताचा हा आंतरराष्ट्रीय T20 सामन्यातील सलग १३ वा विजय आहे. सलग १३ सामने जिंकणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे.

कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याने संघाला झटपट सुरवात करून दिली. पण १४ चेंडूत ५ चौकारांसह २४ धावा करून तो बाद झाला. दीपक हुड्डाने मोईनवर सलग दोन षटकार खेचून खाते उघडले. पण सलामीवीर इशान किशन (८) झेलबाद झाला. पॉवरप्लेमध्ये भारताने २ बाद ६६ धावा केल्या. सूर्यकुमारने मोईनच्या चेंडूवर चौकार मारून खाते उघडले. हुड्डा ३३ धावा करून जॉर्डनचा बळी ठरला. त्याने १७ चेंडूंच्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले.

हार्दिकने १० व्या षटकात दोन चौकारांसह भारताची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली. जॉर्डनच्या एका उसळत्या चेंडूवर सूर्यकुमार (३९) यष्टिरक्षक बटलरकरवी झेलबाद झाला. त्याने १९ चेंडूंच्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकार मारले. हार्दिकने केवळ ३० चेंडूत षटकार आणि नंतर पार्किन्सनवर धाव घेत अर्धशतक पूर्ण केले. ५१ धावा केल्यानंतर तो टॉपलीच्या चेंडूवर झेलबाद झाला. भारतीय संघाला शेवटच्या तीन षटकांत केवळ २० धावाच करता आल्या. संघाने ८ बाद १९८ धावा केल्या. मोईन अली आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी २ बळी घेतले.

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात कर्णधार जोस बटलरला खाते न उघडता भुवनेश्वर कुमारने बोल्ड केले. ५ व्या षटकात हार्दिक गोलंदाजी करायला आला आणि मालनने लिव्हिंगस्टोनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पॉवरप्लेमध्ये इंग्लंडचा संघ तीन गड्यांच्या मोबदल्यात केवळ ३२ धावाच करू शकला. सलामीवीर जेसन रॉयनेही १६ चेंडूत चार धावा केल्यानंतर हार्दिकचा चेंडू हर्षल पटेलच्या हातात खेळला. यानंतर मोईन अली आणि हॅरी ब्रूक यांच्यात ६१ धावांची भागीदारी झाली.

यजुवेंद्र चहलनेही त्याच षटकात प्रथम ब्रूक (२८) आणि नंतर मोईन अली (३६) यांना बाद करून इंग्लंडच्या उरलेल्या आशा संपुष्टात आणल्या. ख्रिस जॉर्डनने नाबाद २६ धावा केल्या. पण त्यामुळे फक्त पराभवाचे अंतर कमी झाले. हार्दिक पांड्याने सॅम कॅरेनला बाद करून चौथी विकेट घेतली. त्‍याच्‍या चेंडूवर एक झेलही सुटला आणि तो ५ वी विकेट घेण्‍यास मुकला. अखेरच्या षटकात इंग्लंडचा डाव १४८ धावांवर आटोपला. हार्दिकने ४ तर चहल आणि नवोदित अर्शदीप सिंगने २-२ विकेट घेतल्या.

T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात चार विकेट घेणारा हार्दिक हा १२ वा क्रिकेटपटू ठरला. आयसीसीत ही कामगिरी करणारा तो पाचवा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या आधी वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन, अफगाणिस्तानचा समिउल्लाह शिनवारी आणि पाकिस्तानचा मोहम्मद हाफिज यांनी ही कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *