![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात (Pandharpur) विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून नवले दाम्पत्यांना मान मिळालाय. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली.
महापूजेनंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधताना वारकऱ्यांचं तोंडभरुन कौतुक केलंय. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या हितासाठी मी विठ्ठलाकडं प्रार्थना केलीय. माझ्या कार्यकाळात मी वारकऱ्यासांठी विकास आराखडा तयार करणार असून स्वच्छ आणि सुविधायुक्त पंढरपूर साकारणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, त्यामुळं लागेल ती मदत वारकऱ्यासांठी केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठूनामाचा जयघोष करत पंढरीच्या पावनभूमीत आले आहेत. गेली दोन वर्ष कोरोनामुळं कार्यक्रम होऊ शकला नाही. पण, यंदा वारकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. १० लाखांहून अधिक वारकरी या वारीत सहभागी झाले, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोरोनाचं संकट गेलं पाहिजे. ते जातंय, परत वाढतंय; पण आता त्याची जाण्याची वेळ आलीये. पांडुरंगाच्या पुण्याईनं हे संकट देखील दूर होईल. राज्यावरील दु:ख, अरिष्ट, संकट, सर्व अडचणी दूर होवो, अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करत असून विठ्ठलाला साकडही घातल्याचं शिंदे म्हणाले.