महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी सोमवारी रत्नागिरीत झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलताना बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. यावेळी बंडखोरांवर टीका करताना ते जनतेच्या प्रश्नांसाठी नसून वैयक्तिक स्वार्थासाठी तिकडे गेल्याची टीका अनंत गीतेंनी केली. “जे सुरू आहे ते दुर्दैवं आहे. फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी ज्यांनी कुणी बंड केले, त्यात जनतेचं हित काय आहे? ते कोकणच्या विकासासाठी गेले आहेत का? जनतेच्या प्रश्नासाठी गेले आहेत का? त्यात नुकसानच होणार आहे. पण या सगळ्या नुकसानाला जबाबदार हे बेईमान बंडखोर असणार आहेत”, असं गीते म्हणाले.
“वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेल्यांपैकी एकही आता परत येणार नाहीत. ते प्रयत्न उद्धव ठाकरेंनी करू नयेत. मी उद्धव ठाकरेंनाही सांगणार आहे. जे गेलेत, त्यांना मातीत गाडून टाकू आणि नव्याने शिवसेना उभी करू. बंडखोरांच्या गळ्यात पट्टा बांधला आहे आणि साखळी भाजपाच्या हातात आहे. त्यातला एकही परत येणार नाही”, असं देखील अनंत गीते यावेळी म्हणाले.
दरम्यान, अशा प्रकारे शिवसेनेच्या गळ्याला नख लावण्याचं पाप करू नये असा इशारा आपण मोदींना दिल्याचं गीते म्हणाले. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे. इशारा हा शब्द मुद्दाम वापरतोय. फक्त राजकीय फायद्यासाठी, सत्तेसाठी शिवसेनेसारख्या कडवट हिंदुत्ववादी संघटनेच्या गळ्याला नख लावण्याचं पाप तुम्ही करू नका. हे सांगण्याचं धाडस माझ्याकडे आहे. तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही कोणतं पाप करत आहात. शिवसेना ही केवळ महाराष्ट्राची गरज नसून अखंड हिंदू राष्ट्राची गरज आहे”, अशा शब्दांत गीतेंनी संताप व्यक्त केला.