महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे 19 जुलैला पुन्हा सुनावणी होणार आहे. आज सुनावणीदरम्यान राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात तूर्तास कोणतीही नवी अधिसूचना न काढण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले. त्यामुळे कोर्टाचा आदेश येईपर्यंत राज्यात कोणत्याही नवीन निवडणुका जाहीर होणार नाही. तसेच, राज्य सरकारने स्थानिक निवडणुकांसंदर्भात काही अधिसूचना जारी केल्या असतील, तर त्यात हस्तक्षेप करणार नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले.
महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणासाठी ट्रिपल टेस्टची अट पूर्ण केल्याचे सरकारकडून आज कोर्टात सांगण्यात आले. त्यानंतर तूर्तास निवडणुकीची कोणतीही नवी अधिसूचना काढण्यास कोर्टाने मनाई केली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत ओबीसी आरक्षण देण्याबाबत कोर्ट सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. याविषयी राज्याचे माजी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी सांगितले की, यापूर्वी 92 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र, त्यांची अधिसूचना जारी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे या निवडणुकादेखील लांबण्याची शक्यता आहे. तसेच, आजच्या सुनावणीवरुन कोर्टाचा निकाल हा ओबीसी समाजासाठी दिलासा देणार ठरेल असे वाटते, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.