महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । जून महिन्यात दांडी मारलेल्या पावसाने (Maharashtra Rains Update) जुलै महिन्यात दमदार आगमन केलं. राज्यातीव विविध भागात जोरदार पाऊस बसत आहे तर काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. प्रचंड पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना पूर (Flood) आला आहे. गावं, वस्त्या पाण्याखाली गेल्या आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातही पावसाची संततधार सुरुच आहे.
पाच जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट (Red Alert in five District) जारी केला आहे. यात पालघर, रायगड, नाशिक, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.
मागच्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने नद्या इशारा पातळीच्या बाहेर गेल्या आहेत. पंचगंगा नदीसह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आल्याने नद्यांजवळील गावांना जिल्ह्याधिकारी कार्यालयाकडून स्थलांतराचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसाने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी 31 फुटांवर पंचगंगा नदीची पातळी होती झालेल्या पावसाने तब्बल 4 फुटांनी वाढ झाली आहे. यामुळे लवकरच पंचगंगा नदी इशारा पातळीकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.