महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल ४० शिवसेना आमदारांचा गट बनवून थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर आव्हान निर्माण केले. शिंदे यांच्या पवित्र्यामुळे उद्धव ठाकरे यांना राज्यातील सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपद सोडण्याची नामुष्की ओढावली. शिंदे यांनी ५० आमदारांना सोबत घेऊन भाजपाला साथ दिली. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर एकनाथ शिंदे विराजमान झाले आणि उपमुख्यमंत्रिपदाची धुरा देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर आली.
आमदारांसोबत अनेक नगरसेवकही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदारांचा मोठा गट शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. खासदारांचा दोन तृतीयांश गट शिंदे गटात सहभागी होऊ शकतो. सध्या याबाबत हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक पार पडली. यात शिवसेनेचे १५ खासदार उपस्थित होते. ४० आमदारांनंतर शिवसेनेच्या १८ पैकी १५ खासदार वर्षा बंगल्यावर ही बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. झी २४ तास या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.