महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । देशात सहा पदरी, आठ पदरी राष्ट्रीय महामार्ग बांधले जात आहेत. मात्र यावर वेगाच्या मर्यादा आहेत. जागोजागी स्पीड गन आहेत. नियम मोडले की वाहनचालकांना दंड भरावा लागतो. मात्र आता सध्याच्या वेगाची मर्यादा वाढवण्याबाबत सरकार विचार करत आहे. त्यासाठी केंद्र व राज्याच्या माध्यमातून लवकरच कायद्यात दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या मराठवाड्याच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. गडकरी म्हणाले, ‘मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. आपण रस्त्यांची रुंदी वाढवत आहोत. पण वेगमर्यादेबाबत लोकांच्या तक्रारी आहेत. याबाबतचे केंद्र आणि राज्याचे कायदे वेगवेळे आहेत. त्यावर उपाय म्हणून आम्ही बंगलोरला केंद्र आणि सर्व राज्यांची लवकरच एक बैठक घेणार आहोत. त्यात चर्चा करुन दोन्हीकडील कायद्यात दुरुस्तीबाबत मार्ग काढण्यात येईल. परिणामी वाहनचालकांची ही अडचण लवकरच दूर होणार आहे. औरंगाबाद- पुणे ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम लवकरच सुरु केले जाईल. त्यासाठी येत्या चार महिन्यात भूसंपादन सुरु होईल. तसेच औरंगाबाद- पैठण महामार्गाचेही चौपदरीकरण केले जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.