महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । जून महिन्याच्या अखेरपर्यंत पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या पुणेकरांना गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या पावसाने झोडपून तर काढलेच, पण पावसाची सरासरीही ओलांडून तो पुढे गेला आहे. जुलैच्या १ तारखेला केवळ ४० मिलिमीटरपर्यंत हंगामातील पावसाची नोंद झाली होती. त्यात जुलैच्या सुरुवातीलाच तब्बल २५० मिलिमीटरहून अधिकची भर पडली आहे. जोरदार पावसाने पुणेकर काही प्रमाणात हैराण झाले असले, तरी धरणाक्षेत्रांत होत असलेला पाऊस आणि वाढणाऱ्या पाणीसाठ्याबाबत सामाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जूनच्या संपूर्ण महिन्यामध्ये मोसमी पावसाला पोषक वातावरण नव्हते. त्यापूर्वी पूर्वमोसमी पावसानेही शहाकडे पाठ फिरविली होती. जूनच्या १० तारखेनंतर पुणे शहर आणि परिसरात मोसमी पाऊस दाखल झाल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात पाऊस पडतच नसल्याने चिंता व्यक्त केली जात होती. जूनच्या संपूर्ण महिन्यामध्ये दोन ते तीन वेळेलाच शहरामध्ये पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. बहुतांश वेळेला शहरात उन्हाच्या झळाच जाणवत होत्या. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पाणीसाठ्यात मोठी घट झाली होती. त्यामुळे दीर्घकाळ पाणीकपातीची टांगती तलवार पुणेकरांवर होती. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात चित्र काही प्रमाणात बदलले.