शिवसेनेला मोठा धक्का, पहिल्या खासदाराचं जाहीर बंड, सेनेला ‘जय महाराष्ट्र’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरणारे कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात डेरेदाखल झाले आहेत. केवळ निष्ठा आणि भावनिकेतेवर राजकारण करता येत नाही, सत्तेबरोबर राहून विकास करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे खासदार मंडलिक यांनी शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जावे असा आग्रह त्यांच्या कार्यकर्त्यांनी धरल्याने तेही बंडात सहभागी झाले. दरम्यान, दुसरे खासदार धैर्यशील मानेही याच वाटेवर असल्याने जिल्ह्यात सेनेला मोठे खिंडार पडले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात कोल्हापूर जिल्ह्यातील सेनेचे माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील, आमदार प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर हे तीन नेते सहभागी झाले. या तिघांच्या विरोधात कोल्हापुरात शिवसेनेने आंदोलन केले. यामध्ये खासदार मंडलिकही सहभागी झाले. ‘जे गेले ते बेटेंक्स आणि राहिले ते सोने’ असे म्हणत त्यांना गेलेल्या नेत्यांवर आगपाखड केली. पण, गेल्या चार पाच दिवसात त्यांची भूमिका बदलत गेली. मुंबईतील मातोश्रीवर झालेल्या बैठकीस आणि कोल्हापुरातील पक्षाच्या मेळाव्यास त्यांनी दांडी मारली. यामुळे त्यांच्याबाबत संशयाचे वारे फिरू लागले होते.

शनिवारी त्यांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीतच शिवसेनेला राम राम करण्याचा निर्णय झाला. कार्यकर्त्यांनी आग्रह करायचा, त्यानुसार मंडलिकांनी निर्णय जाहीर करायचा अशी स्क्रीप्ट लिहिली गेली. त्यानुसार कागल तालुक्यातील हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यांचे सुपुत्र विरेंद्र मंडलिक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाण्याचा आग्रह धरला. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने उर्वरित काळात मोठा निधी आणून जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मंडलिकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. दिल्लीत याबाबत ते अधिकृत घोषणा करतील.

मंडलिकांसोबत दुसरे खासदार धैर्यशील माने हेदेखील शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांनीही कोल्हापुरातील पक्षाच्या बैठकीस दांडी मारली होती. ते सध्या दिल्लीत आहेत. राज्यातील १४ ते १५ खासदार एकाचवेळी शिंदे गटात जाण्याची घोषणा करणार आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे दोन्ही खासदार असणार आहेत. या बदल्यात दोघांनाही भाजपची लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे. धनंजय महाडिक राज्यसभेवर गेल्याने कोल्हापुरातून मंडलिकांची उमेदवारी आता निश्चित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *