नैसर्गिक आपत्ती :राज्यात अतिवृष्टीचे 104 बळी ; 275 गावांना पुराचा फटका

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । अतिवृष्टीचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला असून २७५ गावांतील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापर्यंत १०४ जणांना आपला जीव गमवावा लागला असून ६८ जण जखमी आहेत. यंदाच्या मोसमात सरासरी ४९९ मिमी पावसाची नोंद झाली असून चोवीस तासांत सरासरी ८.३ मिमी पाऊस पडल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

राज्यात १ जून २०२२ पासून आतापर्यंत एकूण ४९९.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या अतिवृष्टीमुळे राज्यातील पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, दनगर, बीड, लातूर, वाशिम, यवतमाळ, धुळे, नागपूर, पालघर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग अशा एकूण २३ जिल्ह्यांना फटका बसला. राज्यभरातील ४४ घरांचे नुकसान झाले असून १३६८ घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. राज्यभरात ७३ ठिकाणी निवारा केंद्रे उभारण्यात आली असून पूर परिस्थितीतून ११ हजार ८३६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. राज्यात गेल्या २४ तासांत सरासरी ८.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून दोन गावांना त्यांचा फटका बसला.

गडचिरोली : भामरागड, सिरोंचामध्ये घुसले पाणी
गडचिरोली | गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे. शुक्रवारी व शनिवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यामुळे बंद असलेल्या काही मार्गावरून वाहतूक सुरू झाली होती. मात्र, शनिवारी रात्रीपासून जिल्हाभर जोरदार पावसाने हजेरी लावली. पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी दुसऱ्यांदा भामरागड गावात शिरले.

भामरागडला लागून असलेल्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग व दिना नदी पुलावरून पाणी वाहत असल्याने आलापल्ली ते आष्टी मार्ग बंद आहे. चामोर्शी-गडचिरोली, अहेरी बेजुरपल्ली-पर्सेवाडा, देवलमरी- अहेरी, सोमनपल्ली जवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने निझामाबाद सिरोंचा जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग तसेच भामरागड, लाहेरी बिनगुंडा राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. सिरोंचा तालुक्यातील बोरमपल्ली ते नेमडा, कंबालपेठा ते टेकडा चेक व पर्सेवाडा-चिकेला- जाफराबाद येथील नाल्यावरील रपटे वाहून गेल्याने मार्ग बंद आहे.

नागपूरमध्ये सर्वाधिक मृत्यू
अतिवृष्टीमुळे नागपूर विभागात सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात नागपुरातील १५, वर्धा येथील ४, भंडारा येथील २, गोंदिया येथील ६ आणि गडचिरोली येथील ५ अशा ३२ जणांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ नाशिक येथे २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात नाशिकमधील १३, नंदुरबार येथे ३, धुळे येथे २ जळगाव येथे ४ आणि नगर येथील ३ जणांचा समावेश असल्याचे आपत्ती विभागाने सांगितले.

गोदावरीने ओलांडली धोक्याची पातळी
गडचिरोलीत २४ तासांत २०.०० मिमी पाऊस पडला असून येथील वैनगंगा, प्राणहिता आणि वर्धा नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत. गोदावरी आणि इंद्रावती धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. येथील १०,६०६ जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्र उघडण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *