महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । ‘राज्यात ईडी आणि पैशांच्या मदतीने जबरदस्तीने कायदा मोडून सत्तांतर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीत योग्य तो निकाल होईल. येत्या एक ऑगस्टला घटनेप्रमाणे निकाल होईल. घटनेच्या दहाव्या परिशिष्टांचे पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झालेले आहे. त्यामुळे शिंदे गटाचे सर्व आमदार निलंबित होतील. त्यामुळे पुन्हा राज्यात अस्थिर परिस्थिती निर्माण होईल,’ असे भाकीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तविले.
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजप सरकारच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना ‘ईडी’ची नोटीस देऊन चौकशीसाठी बोलविण्यात आले. त्याच्या निषेधार्थ प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज पाटील, डॉ. विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे; तसेच शहर काँग्रेसचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.