महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । सीएनजी दरवाढीचा थेट फटका आता रिक्षा प्रवाशांना बसणार आहे. इंधनातील दरवाढ लक्षात घेता पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात रिक्षाच्या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार रिक्षाच्या पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी दोन रुपये, तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी रिक्षा प्रवाशााला एक रुपया जादा भाडे मोजावे लागणार आहे. १ ऑगस्टपासून ही भाडेवाढ लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला.
सीएनजीच्या दरामध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये दहा रुपयांची वाढ झाली आहे. इंधनातील ही दरवाढ लक्षात घेता रिक्षाच्या भाड्यामध्ये वाढ देण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून करण्यात आली होती. त्यावर प्राधिकरणाचे अध्यक्ष, जिल्ह्याधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. रिक्षा भाडेवाढीबाबत खटुआ समितीच्या शिफारशींनुसार हा निर्णय घेण्यात आला.
सध्या रिक्षाच्या पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी २१ रुपये आकारण्यात येत आहेत. त्यात आता दोन रुपयांची वाढ होणार असून, पहिल्या टप्प्यासाठी प्रवाशांना २३ रुपये मोजावे लागणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १४ रुपयांऐवजी १५ रुपयांची भाडेआकरणी केली जाणार आहे.
रिक्षा मीटरचे प्रमाणीकरण करण्यासाठी मुदत –
“बदललेल्या भाडेदरानुसार रिक्षा मीटरचे प्रमाणीकरण करण्यासाठी १ ऑगस्टपासून ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. १ ऑगस्टपर्यंत मीटरचे प्रमाणीकरण केलेल्या रिक्षांसाठीच नवे भाडेदर लागू असतील.”, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि प्राधिकरणचे सचिव डॉ. अजित शिंदे यांनी दिली.