महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी येत्या काळात आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. (IMD Monsoon updates Weather Forecast Maharashtra Konkan)
राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. बुधवारसाठी पुण्यासह राज्यातील 18 जिल्ह्यांना IMD कडून इशारा देण्यात आलाय.
मागील आठवड्यात मराठवाड्यासह विदर्भात जोरदार पावसानं हजेरी लावली. नाशिक आणि पालघर जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं. तर मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मात्र गेल्या तीन-चार दिवसांत पावसानं उसंत घेतली. मात्र आता हवामान विभागाकडून राज्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.