महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दोन सत्रांत जवळपास सहा तास चौकशी केली. सायंकाळी सातच्या सुमारास त्या ईडी कार्यालयातून बाहेर आल्या. तपास यंत्रणेने त्यांना बुधवारीही चौकशीसाठी बोलावले आहे. त्यांच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी देशभर ठिकठिकाणी निदर्शने केली. यादरम्यान राहुल गांधी यांच्यासह 50 खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. सोनिया गांधींनी सकाळी 11 च्या सुमारास ईडी कार्यालयात हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत राहुल व प्रियंका गांधी हेदेखील होते.
ईडीने सोनिया गांधी यांची चौकशी सुरू करताच राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांनी संसदेपासून राष्ट्रपती भवनपर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर विजय चौकाजवळील रस्त्यात धरणे आंदोलन केले. यावेळी दिल्ली पोलिसांनी युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांचे केस पकडून त्यांना आपल्या गाडीत कोंबले. दिल्ली पोलिसांच्या कारवाईतील बेबंदशाही आणि ईडी चौकशीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
आज राज्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सत्याग्रह आंदोलन केले. मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘जब जब मोदी डरता है, पोलीस को आगे करता है’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर आंदोलनात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विधिमंडळ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजितसिंह सप्रा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना व कार्यकर्त्यांना अटक केली.