महाराष्ट्र २४- ऑनलाईन – फेसबुकने रिलायन्स जिओमध्ये ९.९९ टक्के शेअर विकत घेतले आहेत. दोन्ही कंपन्यांनी याबाबत वक्तव्य जारी केलं. फेसबुक जिओमध्ये ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भारतीय टेक क्षेत्रातील ही सर्वात मोठी परकीय गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सला मोठा फायदा होणार आहे. जिओ अॅप्स प्लॅटफॉर्मचं मूल्य वाढून ४.६२ लाख कोटी रुपये होईल. या करारामुळे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजवरील कर्ज आणखी कमी होईल आणि मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकला एक मजबूत प्लॅटफॉर्म मिळेल. फेसबुक आणि जिओ विविध प्रोजक्टवर एकत्रितपणे काम करणार आहे, ज्यामुळे देशभरात व्यवसायाच्या संधी निर्माण होतील, असं दोन्ही कंपन्यांनी आपल्या वेगवेगळ्या जारी केलेल्या वक्तव्यांमध्ये म्हटलं आहे.
बुधवारी स्टॉक मार्केट सुरू होताच रिलायन्सचे स्टॉक १३२०.५५ रुपयांसह ६.८ टक्क्यांनी वधारलेले होते. जिओची मालकी ही रिलायन्सकडेच राहणार आहे. भारतीय टेक क्षेत्रातील ही सर्वात मोठी परकीय गुंतवणूक असल्याचंही रिलायन्सने सांगितलं.भारतीयांची सेवा करण्यासाठी आणि डिजीटल परिवर्तनासाठी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यासोबत भागीदारी केली आहे, अशी प्रतिक्रिया मुकेश अंबानी यांनी दिली. करोना संकटानंतर भारतीय अर्थव्यवस्था सुरळीत होईल आणि अत्यंत कमी वेळात पूर्वपदावर येईल याची अपेक्षा आहे. या परिवर्तनासाठी या गुंतवणुकीचा खरोखर फायदा होईल, असंही ते म्हणाले.
या करारामुळे भारताबद्दलची वचनबद्धता अधोरेखित होते, असं फेसबुकने म्हटलं आहे. ‘महिन्याला ३८.८ कोटी युझर्ससह फेसबुकसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ असून फेसबुकच्याच व्हॉट्सअपचे भारतात एकूण ४० कोटी युझर्स आहेत. सध्याच्या परिस्थितीत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण, छोटे उद्योग प्रत्येक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे असतात आणि त्यांना मदतीची गरज असते. भारतात ६ कोटींपेक्षा जास्त छोटे उद्योग आहेत आणि लाखो लोकांना यामुळे रोजगार मिळतो’, असं मार्क झुकरबर्ग म्हणाले.
भविष्यात लवकरच जिओचा नवीन डिजीटल प्लॅटफॉर्म जिओ मार्ट आणि व्हाट्सअपकडून जवळपास ३ कोटी किराणा दुकानांमध्ये डिजीटल व्यवहार होईल. म्हणजेच तुम्ही दररोज लागणाऱ्या वस्तूंची डिलिव्हरी जवळच्या दुकानातून वेगाने मागवू शकता, असं अंबानी म्हणाले. डिजीटल तंत्रज्ञान वापरुन छोट्या किराणा दुकानदारांनाही त्यांचा उद्योग वाढवता येईल आणि यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील, असंही ते म्हणाले. जिओ मार्ट आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून देशात आणखी रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं फेसबुकनेही म्हटलं आहे.