5G Spectrum: जिओ ची 5 जी स्पेक्ट्रम लिलावात बाजी, स्वस्त इंटरनेट सेवा देणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ ऑगस्ट ।देशातील 5 जी स्पेक्ट्रमसाठी झालेल्या लिलाव प्रक्रियेत रिलायन्स जिओने बाजी मारली आहे. रिलायन्स जिओने लिलावात 88 हजार 078 कोटी रुपयांची बोली लावली. तर, भारती एअरटेलने 43,084 कोटी, व्होडाफोन आयडियाने 18 हजार 799 कोटी रुपयांची बोली लावली. तर, अदानी समूहाने 212 कोटींची बोली लावली. रिलायन्स जिओ देशातील सगळ्यात स्वस्त 5 जी इंटरनेट सेवा देणार असल्याची घोषणा आकाश अंबानी यांनी केली आहे. त्यामुळे ‘टॅरिफ वॉर’ होण्याची दाट शक्यता आहे.

मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या 5-जी स्पेक्ट्रम लिलावातून सरकारला 1 लाख 50 हजार 173 कोटी रुपये मिळाले आहेत. यामध्ये रिलायन्स जिओचा वाटा 59 टक्क्यांच्या जवळपास आहे. रिलायन्स जिओने 5 जी स्पेक्ट्रमसाठी एकूण 88,078 कोटी रुपयांची बोली लावली. रिलायन्स जिओ टेलिकॉमच्या 22 सर्कलमध्ये सर्वाधिक बोली लावणारी कंपनी ठरली. रिलायन्स जिओला 700 मेगाहर्ट्जसाठी बोली लावली. अदानी समूहाच्या अदानी डेटा नेटवर्कसने 400 मेगाहर्ट्जच्या 5 जी स्पेक्ट्रमसाठी 212 कोटींची बोली लावली लावली आहे.

रिलायन्स जिओला देशातील सर्व 22 सर्कलसाठी 700MHz स्पेक्ट्रम मिळाले आहेत. 5-जी इंटरनेट सेवेसाठी 700MHz ही सर्वोत्तम फ्रिक्वेन्सी आहे. रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी सांगितले की, देशातील सगळ्यात स्वस्त 5 जी इंटरनेट सेवा रिलायन्स जिओ देणार आहे. जागतिक पातळीवरील मानकांनुसार रिलायन्स जिओ 5-जी इंटरनेट सेवा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील डिजीटल क्रांतीला रिलायन्स जिओ आणखी गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण, आरोग्य, कृषी, ई-गव्हर्नन्स आदी क्षेत्रात रिलायन्स जिओची 5-जी मदतशीर ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून भारत नवीन आर्थिक महाशक्ती होईल. याच विचाराने जिओची सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

5G नेटवर्कचा वेग 4G नेटवर्कपेक्षा 10 पट जास्त असेल. 5G नेटवर्कद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलवर काही सेकंदात संपूर्ण चित्रपट डाउनलोड करू शकाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *