महाराष्ट्र २४- ऑनलाईन – नांदेड – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – राज्यात करोनाने थैमान घातलं असताना नांदेड जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाने प्रचंड काळजी घेतली होती. यामुळे नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता. नांदेड जिल्ह्यात एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील ६४ वर्षीय वृद्ध व्यक्तीला करोनाची लागण झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. यानंतर प्रशासनाची बैठक सुरू झाली आहे. नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र मंगळवारी पाठवलेल्या चाचणी नमुन्यांपैकी एकाला संसर्गजन्य आजाराची लागण झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. यानंतर प्रशासन अधिक दक्ष झाले असून यानिमित्ताने कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
पहिल्यांदा लॉकडाऊन घोषित केल्यापासून जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी जिल्ह्यातील परिस्थिती ही आखून दिलेल्या नियमांप्रमाणे काटेकोर पद्धतीने हाताळली होती. यामुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता.
नांदेड जिल्ह्यातून मंगळवारी रात्री आठ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भोसीकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो राहात असलेला संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर आणि पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.