CNG दरवाढीवरुन जितेंद्र आव्हाडांचा सवाल ; ‘रिक्षावाला कमावणार काय? खाणार काय?’

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । CNG दरावरुन माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सवाल केले आहेत. आव्हाडांनी म्हटलं आहे की, वर्षभरामध्ये CNG चा दर 36 रुपयांनी वाढला आहे. कालच रात्री CNG च्या दरामध्ये 6 रुपयांनी वाढ झाली असल्याची बातमी आली. प्राप्त परिस्थितीमध्ये मी हे लिहीत असताना कदाचित रिक्षामध्ये बसणारे थोडेसे अस्वस्थ होतील. पण, संसार तर सगळ्यांनाच चालवायचा असतो. रिक्षामध्ये होणारा CNG चा वापर आणि रिक्षाला प्रति किलोमीटर किती CNG लागतो. ह्याचे गणित मांडले तर कमाईतील 50 टक्के हे CNG रिक्षामध्ये टाकण्यात जातात. साधारण 12 तासामध्ये एखाद्या रिक्षावाल्याने 1000 रुपये कमावले. तर त्यामधील कमीत-कमी 400 रुपये हे त्याला CNG पोटी खर्च करावे लागतात. जेव्हा CNG चे दर कमी होते तेव्हा CNG वरची रिक्षा परवडत होती आणि त्याचा फायदा देखील होता.

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, त्यामधील एक मुख्य मुद्दा असा आहे कि, रिक्षा चालवणारे अर्धेअधिक चालक हे रिक्षाचे मालक नसतात तर त्यांनी दिवसभर केलेल्या धंद्याचे काही टक्के हे मालकाला द्यावे लागतात. अशा आर्थिक करारावरती रिक्षा चालवली जाते. कुठल्याही झोपडपट्टीमध्ये भाडेतत्वावर घर घेण्याचे ठरवले तर कमीत-कमी 4 ते 5 हजार रुपये इतके भाडे भरावे लागते. संपूर्ण संसाराचा खर्च विचारात घेतला तर ते अधिक 5000 रुपये होतात. म्हणजे रिक्षावाला कमावणार काय? खाणार काय? आणि मेहनत करणार काय? असा सवाल आव्हाडांनी केला.

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, आज ठाणे तसेच मुंबईमध्ये जवळ-जवळ लाखोने रिक्षा चालक-मालक आहेत. सध्याच्या महागाईचा विचार करता रिक्षा चालक आपला संसार कसा चालवत असतील याचा आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. कारण, रिक्षा ही आता वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. एकेकाळी राज्य किंवा महापालिका यांची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोसळलेली असतांना सामान्य माणसाला रिक्षाशिवाय पर्याय राहिलेला नाही. अशा अवस्थेमध्ये रिक्षा चालक- मालकांसमोर आलेली अडचण याबाबत समाजाने जरुर विचार करावा.

आव्हाड यांनी म्हटलं आहे की, हे सरकार शेती मालामध्ये देखील भाव वाढवायला तयार नाही. पण, त्याच्यावरती GST लावायला तयार झाली आहे. फिक्स प्राईस वरती त्यांचा विश्वास नाही म्हणजे विकत घेणा-याला सर्वच फायदे मिळाले पाहीजेत हा केंद्र सरकारचा विचार आहे. पण, यामधून शेतकरी असो… नाहीतर रिक्षाचालक… यांचे संसार कसे चालतील याचा कुठलाही विचार समाजातील एकही घटक करताना दिसत नाही. आपण एवढे आत्मकेंद्रीत झालो तर पुढे कसे होईल. याचा आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा, असंही आव्हाड म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *