महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑगस्ट । बारामतीतील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींशी आज (शनिवार) दिल्ली येथील निवासस्थानी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी संवाद साधताना अनेक विषयांना स्पर्श केला. विद्यार्थ्यांकडून शेतकरी आत्महत्या या उपस्थित झालेल्या मुद्यावर पवार यांनी आत्महत्या हा पर्याय नाही, तर आलेल्या परिस्थितीवर मात करून आपण त्यातून बाहेर कसं पडायचं, आपलं उत्पन्न कसं वाढवायचं, तंत्रज्ञान कसं वाढवायचं या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे असं नमूद केले. शेतीवर अवलंबून असणारी कारखानदारी वाढवली पाहिजे ही आजची गरज असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केलं.
पवार म्हणाले राज्यात आत्महत्येचा प्रश्न प्रामुख्याने विदर्भात जास्त होतो. यवतमाळ आणि वर्धा या दोन जिल्ह्यात आत्महत्या अधिक होतात. या जिल्ह्याची स्थिती आणि शेतीचे क्षेत्र बघितले तर पश्चिम महाराष्ट्रापेक्षा विदर्भात जमीन जास्त आहे. पण पाण्याची कमतरता आणि खात्रीचे पीक याची शाश्वती नसणे, या गोष्टींमुळे जर आर्थिक संकट आले तर त्या संकटाला तोंड देण्याऐवजी कधीकधी टोकाची भूमिका घेतली जाते. आत्महत्या टाळावी यासाठी अनेक गोष्टी करण्याचा मी स्वतः प्रयत्न केला.
७० हजार कोटींची कर्जमाफी करून शेतकऱ्यांना सहकार्य केलं. मात्र काही वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढला. तेव्हा वसुलीची वेळ आल्यावर काहींनी आत्महत्येचा रस्ता घेतला. शेवटी आत्महत्या हा पर्याय नाही, तर आलेल्या परिस्थितीवर मात करून आपण त्यातून बाहेर कसं पडायचं, आपलं उत्पन्न कसं वाढवायचं, तंत्रज्ञान कसं वाढवायचं या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. पंजाब, हरियाणा, दक्षिणेत फार आत्महत्या होत नाहीत. मग आपल्याकडे का होतात? ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करायला हवा अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
पवार म्हणाले शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांनी बदलायला हवा. एका शेतकरी कुटुंबात दोन किंवा तीन मुलं असली तर सगळ्यांनीच शेती करण्याची गरज नाही. एकाने शेती करून बाकी दोघांनी त्यांना ज्या क्षेत्रात जाता येईल तिकडे जावे. निव्वळ शेती सगळ्यांनी करून जमीन वाढत नाही. आपल्या पूर्वजांकडे जेवढी जमीन होती तेवढी जमीन आता राहिलेली नाही. कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करण्याचा विचार केला तर प्रत्येकाच्या वाट्याला जमीन किती येईल, याचा विचार करावा.
त्यापेक्षा एकाने शेती करून इतरांनी वेगळा पर्याय निवडला तर ते घर अधिक संपन्न होऊ शकेल. आपल्याला शेतीसाठी पोषक उद्योग वाढविले पाहिजेत. आपण अनेक ठिकाणी एमआयडीसी काढली आहे. याचे कारण शेतीवरील अवलंबून पोट कमी केले पाहिजे. अधिक हातांना काम दिले पाहिजे. कारखानदारी, दुधाचा व्यवसाय याव्यतिरिक्त नवे व्यवसाय तयार करता येतील का याचा प्रयत्न करायला हवा. शेतीवर अवलंबून असणारी कारखानदारी वाढवली पाहिजे ही आजची गरज आहे असेही पवार यांनी नमूद केले.
दरम्यान पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना लष्करात मुलींचा कसा समावेश झाला याची माहिती दिली. ते म्हणाले देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी असताना मी प्रश्न उपस्थित केला होता की मुलींना लष्करात का घेतलं जात नाही. त्यावर अनेकांनी शक्य नाही असंच उत्तर दिलं. मी सगळ्यांना एक महिना विचार करण्याची संधी दिली. एक महिन्यानंतरही मला तेच उत्तर मिळालं. नेहमीच्या बैठकांनंतर सातव्या बैठकीत मी माझा निर्णय दिला की तीनही दलात ११ टक्के जागा मुलींना दिल्या जातील. निर्णय दिल्यावर तो राबवावा लागतो. आज मी पाहतोय की मागील वर्षीच्या २६ जानेवारीच्या परेडचे नेतृत्व एक मुलगी करत होती.
पवार म्हणाले दुसरी गोष्ट हवाई दलाची होती. या दलात छोटी चूक झाली तरी जीव दगावला जातो. हे अपघात कसे कमी करायचे हा विषय संरक्षण मंत्री व हवाईप्रमुखांपुढे नेहमीच असतो. त्यावेळीही मुलींना याची जबाबदारी दिली. पुढील सहा महिन्यांत देशातील हवाई अपघाताचा रेट खाली आला. त्याचे कारण एखादे काम दिले की ते काम अधिक लक्षपूर्वक व बारकाईने करण्याचा मुलींचा स्वभाव असतो. मुलांचे याउलट काम दिलेले सोडून इतर गोष्टींकडे लक्ष जास्त असते. यातून अपघात होतो. आज तीनही दलांमध्ये मुली उत्तमरीत्या काम करत आहेत. त्यामुळे मुलगा आणि मुलगी यात कोणीही भेद करू नये असा सल्ला देखील पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.