Pune : पुण्यातील जागृत देवस्थान ; श्रावणी सोमवारी होते भाविकांची गर्दी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑगस्ट । पुणे शहराला विद्येचं माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळं आहेत. पुणे शहराला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. या इतिहासामध्ये अनेक धार्मिक स्थळांचा देखील समावेश होतो. त्यापैकीच एक पुण्यातील अरण्येश्वर परिसरामधील श्री भगवान शंकर यांचे अरणेश्वर मंदीर ( Aranyeshwar Temple ) आहे. या मंदिरात भाविक श्रावणी सोमवारी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करतात.

पुण्यातील अरण्येश्वर परिसरामध्ये श्री भगवान शंकर यांचे अरणेश्वर म्हणून हे मंदिर प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध असून या मंदिरामुळे या परिसराला अरणेश्वर हे नाव पडले. पूर्वीच्या काळी जंगलामध्ये हे छोटेसे शिवालय होते. नंतरच्या काळामध्ये या मंदिराचा विस्तार होत गेला आणि आता हे पुण्यातील एक मोठे शिवालय म्हणून ओळखले जाते. हे मंदिर पुण्यातील पर्वती पासून जवळ असून हे पेशवेकाली मंदिर असल्याचे म्हटले जाते. हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून देखील ओळखले जाते. 2019 च्या आंबील ओढ्याच्या पुरामध्ये मंदिराचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र, आता पुन्हा नव्याने मंदिराने पूर्व वैभव प्राप्त केले आहे.

मंदिराचे सहविश्वस्त विवेक वाघुळकरांनी सांगितले की, हे मंदिर सकाळी 6 वाजता भाविकांसाठी खुले होते ते दुपारी 1 वाजेपर्यंत भाविकांसाठी याची द्वार उघडी असतात. त्यानंतर दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत मंदिर बंद असते व संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले असते. सकाळी 7 वाजता आरती होते. तर सांयकाळची आरती 6 वाजता होते.

तसेच दर सोमवारी संपूर्ण दिवसभर मंदिर भाविकांसाठी खुले असते. महाशिवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा, श्रावणी सोमवार आदी महत्त्वाच्या दिवशी मंदिरामध्ये मोठे उत्सव होतात. तसेच हजारो संख्येने भावीक यावेळेस श्री भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी येतात. यावेळेस भाविकांना दूध आणि साबुदाणा, खिचडीचे प्रसाद म्हणून वाटप केले जाते. मंदिरात भगवान श्री शंकरांना फुले, बेलाची पाने, दूध, पेढे आदींचा नैवेद्य अर्पण केला जातो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *