महाराष्ट्र २४- ऑनलाईन – बीड। विशेष प्रतिनिधी। आकाश शेळके। टाळेबंदीमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका परीक्षा केंद्र, परीक्षक, नियमक आणि टपाल कार्यालयात पडून आहेत. त्यामुळे निकालाची संपूर्ण प्रक्रिया रखडली असून ३ मे रोजी टाळेबंदी संपली तरी यंदा निकालाला जुलै महिना उजाडणार असा अंदाज शिक्षण मंडळाने व्यक्त केला आहे.
राज्यात इयत्ता दहावीला १७ लाख तर बारावीसाठी १४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा मार्च महिन्यात संपतात व मेच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये निकालाची घोषणा केली जाते. मागील वर्षी दहावीचा निकाल हा ८ जूनला तर इयत्ता बारावीचा निकाल २८ मे रोजी घोषित करण्यात आला होता. मात्र, टाळेबंदीमुळे राज्यातील प्रत्येक जिह्यंमध्ये परीक्षकांकडेच उत्तरपत्रिका पडून आहेत. त्यामुळे यंदा जुलै महिन्याशिवाय निकालाची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार आहे. शिक्षण मंडळामार्फत ३ मार्चपासून दहावीची परीक्षा घेण्यात येत होती.
दहावीचे सर्व पेपर सुरळीत सुरू होते. परंतु, शेवटचा पेपर उरला असताना टाळेबंदी जाहीर होताच २३ मार्चला होणारा भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला. दहावीच्या १४ मार्च रोजी घेण्यात आलेल्या इतिसाहाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका परीक्षा केंद्र किंवा टपाल कार्यालयांमध्येच पडून आहेत. या उत्तरपत्रिकेच्या सुरक्षिततेसाठी केंद्रसंचालक, परीरक्षकांवर मंडळाची टांगती तलवार असून त्यांना शाळांमध्ये गस्त घालावी लागत आहे.
मात्र, इतिहास विभागाच्या उत्तरपत्रिका केंद्रांवर अडकून पडल्याने दहावीच्या निकालाची संपूर्ण प्रक्रियाच रखडली आहे. इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यासाठी परीक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात आले आहे. त्यामुळे बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि नियमन(मॉडरेशन) झाले असले तरी टाळेबंदीमुळे उत्तरपत्रिका परीक्षकांच्या घरी पडून आहेत. टाळेबंदीचा कालावधी हा ३ मेपर्यंत वाढवण्यात आल्याने परीक्षकांना बोर्डाकडे उत्तरपत्रिका जमा करणे अशक्य आहे.
टाळेबंदी जर ३ मे रोजी संपली तरच शिक्षण मंडळाकडे या सर्व उत्तरपत्रिका जमा होणे शक्य आहे.
मात्र, उत्तरपत्रिका जमा झाल्यानंतरही दहावी इतिहासाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे तर बारावीचा निकाल तयार करण्यासाठी शिक्षण मंडळाला किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे निकालासाठी जुलै महिना उजाडणार असा अंदाज शिक्षण मंडळाकडून व्यक्त केला जात आहे.
काही उत्तरपत्रिका केंद्रांवर, परीक्षकांकडे तर काही टपाल कार्यालयात पडून आहेत. शिक्षकांना वेळोवेळी आवश्यक सूचना दिल्या जात आहेत. टाळेबंदीनंतर सर्व उत्तरपत्रिका शिक्षण मंडळाकडे जमा झाल्यावर निकालाच्या कामाला गती येणार आहे.
– रविकांत देशपांडे,
विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.शैक्षणिक सत्राचा कालावधीही कमी होणार? इयत्ता दहावी आणि बारावी ही विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा ठरवणारी महत्त्वाचे वर्षे असतात. मात्र, टाळेबंदीमुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचे नियोजन बिघडले आहे. दरवर्षी दहावीचा निकाल जाहीर होण्याआधीच इयत्ता अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होते. मात्र, यंदा निकालामध्ये विलंब होणार असल्याने प्रवेशप्रक्रियेअभावी पुढील शैक्षणिक सत्राचा कालावधीही कमी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.