महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. मंत्र्यांच्या नावांची यादी सुद्धा आता निश्चित झाली आहे. पहिल्या टप्प्यात 18 आमदार आज शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा राजभवनात सुरू झाला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळ विस्तारातील पहिल्या टप्प्यात अनेक आमदारांच्या नावांचा समावेश नाहीये. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांना सुद्धा शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाहीये.
शिंदे गटाकडून पहिल्या टप्प्यात गुलाबराव पाटील, संदिपान भूमरे, दीपक केसरकर, तानाजी सावंत, शंभुराजे देसाई, दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड, अब्दुल सत्तार हे आमदार शपथ घेणार आहेत. तर भाजपकडून पहिल्या टप्प्यात चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा हे शपथ घेणार आहेत.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना भाजप नेते आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का बसला आहे. त्यामुळे आता आशिष शेलार यांच्याकडे भाजप नेमकी कोणती जबाबदारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आता भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्याकडे सोपवली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. एक व्यक्ती एक पद या नियमाप्रमाणे हे बदल केले जातील अशी चर्चा आहे.