आरोप करणारे सोमय्या आहेत तरी कुठे? पुजा चव्हाणची आत्महत्या नाही, हत्या ; सोमय्यांचा व्हिडीओ पुन्हा चर्चेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात (Sanjay Rathod) संजय राठोड यांची वर्णी लागताच विरोधकांकडून सडकून टिका होऊ लागली आहे. त्यांच्यावर गंभीर गुन्ह्याचे आरोप असल्याने महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना मंत्रिपदावरुन पाय उतार व्हावे लागले होते. पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राठोड यांचं नाव आलं होतं. दरम्यानच्या काळात भाजप नेत्यांनीच त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. आता त्यांच्यासंबंधी पुरावे असताना देखील त्यांना मंत्रिपद हे महाराष्ट्राचे दुर्देव असल्याची भावना विरोधकांची आहे. तर दुसरीकडे भाजपाचे नेते (Kirit Somaiya) किरीट सोमय्या यांचा एक जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे. ज्यामध्ये त्यांनी राठोड यांची पक्षातून हकालपट्टी नाहीतर त्यांना अटक करावी अशी मागणी करीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली होती. काय झाले कारवाईचे असा सवाल आता नेटकरी विचारु लागले आहेत.

काय म्हणाले होते सोमय्या..?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय राठोड हे मंत्री असताना पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांचे नाव आले होते. त्यामुळे पुजा चव्हाणची आत्महत्या नसून ती एक हत्या आहे. पुजाच्या आत्महत्येला राठोड हेच जबाबदार आहेत. त्यामुळे राठोड यांची केवळ पक्षातून हकालपट्टीच नाहीतर त्यांना तुरुंगवास होणे गरजेचे असल्याचे सोमय्या यांनी सांगितले होते. एवढेच नाहीतर त्यांच्यावरील कारवाईसाठी उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या आदेशाची वाट पाहतात असाही सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री आणि नेत्यांवर आरोप करणारे किरीट सोमय्या आहेत तरी कुठे ? असा सवाल आता नेटकरी विचारत आहेत. शिवाय पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचा कसा संबंध आहे हे पटवून देण्यासाठी ते वारंवार मिडियासमोर येत होते. आता भाजपा आणि शिंदे गटाच्या सरकारमध्ये संजय राठोड यांची थेट मंत्रीपदी वर्णी लागली असताना याबाबत सोमय्या यांची प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे ते आहेत तरी कुठे असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांनी राठोड यांच्यावर केलेल्या आरोपांचा व्हिडीओ मात्र पुन्हा चर्चेत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *