पुणे, पिंपरी-चिंचवड शहर दिवसभर संततधार; वाहतूक कोंडी, नागरिकांची तारांबळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरामध्ये मंगळवारी (९ ऑगस्ट) दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. सकाळपासूनच जोरदार बरसणाऱ्या सरींमुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. शहरालगतच्या घाट विभागांमध्ये पावसाचा जोर मोठा होता. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, शहर आणि परिसरात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या कालावधीत शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. मंगळवारी मात्र अगदी पहाटेपासूनच शहरात पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता. लोणावळा, खंडाळा, मावळ, मुलशी आदी भागातील घाट विभागांमध्ये पावसाचा जोर अधिक होता.

दिवसभर झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले होते. पावसात अनेक चारचाकी वाहनेही रस्त्यावर आल्याने प्रमुख रस्त्यांवर दिवसभर वाहतुकीची कोंडी दिसून येत होती. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, बुधवारी (१० ऑगस्ट) शहर आणि परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारपासून मात्र पावसाचा जोर कमी होत जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *