कोल्हापूरला पुराचा धोका ; पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑगस्ट । राज्यात काही दिवसांपूर्वी उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली असून, राज्यातील अनेक भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, दुसरीकडे येत्या 24 तासांत राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला असून, कोल्हापूर येथील पंचगंगेची पाणी पातळी धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करत आहे.

आज सकाळी 5.30 च्या सुमारास स्वयंचलित दरवाजा क्रमांक 6 उघडण्यात आला असून, यातून 1428 आणि पावर हाऊसमधून 1600 असा एकूण 3028 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पंचगंगेतील वाढत्या पाणीपातळीमुळे कोल्हापूरला पुराचा विळखा बसण्याची शक्यता वर्तवली जात असून, सकाळी सातच्या सुमारास पंचगंगेची पाणी पातळी 40 फुटांवर पोहचली आहे. यामुळे 71 बंधारे पाण्याखाली गेले असून, नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढचे दोन ते तीन 3 दिवस राज्यात पाऊस सक्रीय राहणार आहे. यामध्ये पालघर, दक्षिण कोकण, पुणे आणि पूर्व विदर्भात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई ठाणे, मध्य महाराष्ट्र व विदर्भ काही भाग ऑरेंज‌ अलर्ट देण्यात आला आहे. तर सांगलीतही कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *