राष्ट्रवादीचे हे बडे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला ‘मातोश्री’वर ; या महत्वाच्या ३ मुद्द्यांवर खलबतं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । महिनाभरापूर्वी राज्यात झालेलं सत्तांतर, सत्ता जाताच शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊतांना झालेली अटक, काल शिंदे-फडणवीस सरकारचा संपन्न झालेला मंत्रिमंडळ विस्तार अशा सगळ्या मोठ्या घडामोडीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे बडे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर गेले होते . राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे हे अजितदादांसोबत उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर पोहोचले . या भेटीत सुप्रीम कोर्टातली सुनावणी, मंत्रिमंडळ विस्तार तसेच आगामी अधिवेशन… अशा विषयांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेतल्या बंडानंतर उद्धव ठाकरे एकटे पडल्याचं चित्र होतं. ठाकरेंचे अनेक जिवलग साथीदार त्यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करत होते. बाळासाहेबांसोबतच्या जुन्या निष्ठावंतांनी देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांचा हात धरला. ठाकरेंच्या या संकटाच्या काळात राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये असताना किती चांगल्या पद्धतीने सरकार चालवलं, कोव्हिड काळात त्यांनी त्यांच्या कामाने कसा ठसा उमटवला, हे सांगताना बंडखोरांचे आरोप किती वरवरचे आहेत, हे राष्ट्रवादीचे नेते नि:क्षून सांगत राहिले. एखादा शिवसेना नेताही उद्धव ठाकरेंची एवढ्या चांगल्या प्रकारे बाजू मांडणार नाही, एवढी चांगली बाजू राष्ट्रवादीचे नेते मांडत राहिले.

पण आठवड्याभरापूर्वी शिवसेनेचे फारयब्रँड नेते संजय राऊत यांना अटक झाली अन् राष्ट्रवादीचे नेते मौनात गेले. राऊतांची पाठराखण करायची, त्यांच्या मागे उभं राहण्याची वेळ आल्यावर राष्ट्रवादीने ठाम भूमिका घेतली नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांची ‘चुप्पी’ बघून शिवसेनेने देखील आश्चर्य व्यक्त केलं. यानंतर दैनिक ‘सामना’मधून अग्रलेख लिहून शिवेसेनेने राष्ट्रवादीला खडे बोलही सुनावले. यानंतर राष्ट्रवादीचे नेते जरासे नाराज असल्याची चर्चाही होती.

दुसरीकडे शिवसेना कुणाची? हा सर्वोच्च फैसला सुप्रीम कोर्टात होणार आहे. सुनावणीच्या तारखा पुढे जात आहेत. आतापर्यंत शिवसेनेच्या वकिलांनी शिंदे गटाला तगडी टक्कर दिलीये. शिंदेंच्या बंडखोरीच्या काळात उद्धव ठाकरेंनी ‘सगळं संपलं’ म्हणत ‘शस्त्र’ टाकून देण्याचा विचार केल्यावर शरद पवार यांची ‘लढण्याची भूमिका’ निर्णायक ठरल्याची चर्चा होती. दरम्यान, आजच्या भेटीत सुप्रीम कोर्टातली सुनावणी, मंत्रिमंडळ विस्तार, आगामी अधिवेशन… अशा विषयांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *