महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) ९ ऑगस्ट रोजी पार पडला. मंगळवारी शिंदे गटाच्या आणि भाजपच्या मिळून एकूण १८ मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. तब्बल महिन्याभरापेक्षा अधिक कालावधीनंतर ९ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यामध्ये शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ आमदारांचा समावेश होता.
शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपमधून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित आणि मंगलप्रभात लोढा यांनी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
दरम्यान, या विस्तारावरून आगामी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सुरूंग लावण्याची योजना असल्याचं दिसून येत आहे. आगामी काळात मुंबई आणि औरगाबादसारख्या महापालिकांना लक्ष्य ठेवून हा विस्तार केल्याच्याही चर्चा सध्या सुरू आहेत. परंतु मंत्रिमंडळाचा हा विस्तार भाजप आणि शिंदे गटासाठी फायद्याचा ठरतोय का हे आगामी काळात दिसून येईल.
आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली पालिका निवडणुकांत २२७ पैकी ८२ जागा जिंकून भाजपनं दमदार कामगिरी केली होती. त्यावेळी भाजप शिवसेनेपेक्षा केवळ दोन जागा मागे होती. काही अपवाद वगळला तर गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचंच वर्चस्व आहे. गेल्या काही काळापासून आशिष शेलार पुन्हा एकदा सक्रिय झाले असून त्यांनी अनेक बाबींवरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केलाय.
राज्यातील नेत्यांसोबत मिळून आगामी पालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला टक्कर देणं आणि पालिकेत १३४ पेक्षा अधिक जागा जिंकण्याची योजना तयार केल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अशातच भाजपची नजर औरंगाबाद महानगरपालिकेवरही आहे. हा देखील शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या मंत्रिमंडळ विस्तारात ह्या ठिकाणाहून अतुल सावे (भाजप), अब्दुल सत्तार (शिंदे गट) आणि संदीपान भुमरे (शिंदे गट) यांना संधी देण्यात आली आहे.
तर एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाण्यात शिंदे भाजप युतीला फायदा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बहुतांश विद्यमान नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांचीच साथ दिली आहे. याशइवाय कल्याण डोंबिवलीमध्ये आपलं स्थान भक्कम करण्यासाछी डोबिवलीतून रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. उत्तर महाराष्ट्रातही आपली स्थिती भक्कम करण्यासाठी भाजपनं गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि दादासाहेब भुसे यांसारख्या नेत्यांना मंत्रिमंडळात सामील केलंय.