Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; बाजू मांडण्यासाठी फक्त १५ दिवसांचा वेळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । शिवसेना नेमकी कुणाची यावरून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचलं असताना आता शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे यांना आपली बाजू मांडण्यासाठी फक्त १५ दिवसांचा वेळ दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आपली बाजू २३ ऑगस्टपर्यंत मांडावी लागणार आहे. (Uddhav Thackeray Latest News)

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावरून सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे. सुप्रीम कोर्टातील निकाल लागेपर्यंत शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये अशी विनंती उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली होती. तसेच कागदांची जुळवाजुळव करण्यासाठी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे चार आठवड्यांची मुदत मागण्यात आली होती.

मात्र, निवडणूक आयोगाने शिवसेनेची ही मागणी अमान्य करत त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी फक्त १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे येत्या २३ ऑगस्टपर्यंत शिवसेनेला आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्याआधी राज्यातील सत्तासंघर्षावर २३ ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टापाठोपाठ निवडणूक आयोगातही उद्धव ठाकरे गटाचे टेन्शन वाढणार असल्याचं चित्र आहे.

लोकसभा, विधानसभा आणि पाठोपाठ शिवसेनेच्या राजकीय पक्ष रचनेतही आपलं प्राबल्य असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यासाठीची आकडेवारी देखील निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आली आहे. भाजपासोबत सरकार बनवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी १९ जुलै २०२२ रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते. त्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी, तसेच धनुष्यबाण चिन्ह मिळावं अशी मागणी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *