महाविकास आघाडीत कोणी नाराज तर कोणी आक्रमक, नेमकं चाललंय काय ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । राज्यातील सत्तातरानंतर हळूहळू महाविकास आघाडीतील नाराजीही समोर येत गेली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीची चव्हाट्यावर आली. अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याने जयंत पाटील नाराज होते. यानंतर आता या प्रकरणात थेट शरद पवार यांनाच मध्यस्थी करावी लागली.

जयंत पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे. यासाठी गुरुवारी सिल्वर ओकवर शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी शरद पवार यांनी केली अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात मध्यस्थी केल्याचं समोर येत आहे.

याशिवाय शिवसेनेने परस्पर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्याने काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीनेही नाराजी व्यक्त केली आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र काँग्रेस पक्षातही समन्वय नसल्याचं चित्र दिसत आहे. नाना पटोले यांनी शिवसेनेच्या विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांच्या नियुक्तीला विरोध केला. तर अशोक चव्हाण महाविकास आघाडीसोबत असल्याचा दावा करत आहेत.

गुरुवारीच नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीमधून कधीही बाहेर पडू, असं बोललं होतं. तर अजित पवार यांनी काँग्रेसचे विधीमंडळ नेते महाविकास आघाडीसोबत असल्याचा दावा केला. नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांचं वेगळं मत पहायला मिळतं आहे. त्यामुळे एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये समन्वय राहिला नसल्याचं स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *