महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । जून महिन्यात आणि ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण विदर्भात खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जुलैतच सुमारे १० लाख हेक्टरमधील शेतपिकांची हानी झाल्याची सरकारी आकडेवारी समोर आली. आता नव्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. नुकसानीचे क्षेत्र वाढणार आहे. लागवडीचा वाढलेला खर्च, मशागतीसाठी मनुष्यबळाचा अभाव, बाजारात शेतमालांच्या दराची अस्थिरता अशा विचित्र चक्रात सापडलेले शेतकरी या अतिवृष्टीच्या संकटाचा सामना करताना हतबल झाले आहेत. नुकसान झालेल्या क्षेत्रात आता दुबार पेरणी करणेही शक्य नाही, कारण बहुतांश पिकांचा पेरणीचा कालावधी निघून गेला आहे.
संपूर्ण विदर्भात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, पुरामुळे ९ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्यात अमरावती विभागातील ५ लाख १८ हजार तर नागपूर विभागातील ४ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. नुकसान झालेली बहुतांश शेतजमीन कोरडवाहू आहे. कापूस आणि सोयाबीन पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. नागपूर विभागात सरासरी लागवडीखालील १९.२६ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १६.५० लाख हेक्टर (८५ टक्के) तर अमरावती विभागात सरासरी ३२.२४ लाख हेक्टरपैकी ३१ लाख हेक्टरमध्ये (९६ टक्के) पेरणी आटोपली होती. त्यापैकी १५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज आहे.
अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारच्या नियमांनुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत पुरवण्याची उपाययोजना केली जाते. गंभीर स्वरूपाच्या आपत्तीच्या वेळी निर्धारित प्रक्रियेनुसार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून अतिरिक्त आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते, ज्याचे मूल्यांकन आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाच्या भेटीच्या आधारे केले जाते. शेतपिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्यास ‘एसडीआरएफ’च्या निकषावर कोरडवाहून शेतीसाठी केवळ ८ हजार ८०० रुपये प्रतिहेक्टर, बागायती शेतीसाठी १३ हजार २०० रुपये, तर फळबागांसाठी १८ हजार रुपये हेक्टरी मदत मिळू शकते. ही मदत अत्यंत तोकडी असल्याचा आक्षेप घेतला जातो. नुकसान भरपाई केव्हा मिळणार, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. कारण अजून नुकसानीचे पंचनामेच पूर्ण झालेले नाहीत.