महागाईचे चटके ; देशात तांदूळटंचाईचे संकट, दरवाढीची शक्यता

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । महागाईपाठोपाठ देशात तांदूळटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. चालू खरीप हंगामात पाच ऑगस्टपर्यंत देशातील भातपिकाखालील क्षेत्रात १३ टक्क्यांनी घट झाली असून, कमी पावसामुळे भात पेरणीवर परिणाम झाला आहे. भाताची पेरणी कमी झाल्यामुळे देशात तांदळाची टंचाई निर्माण होऊ शकते. कृषी मंत्रालयाने या संदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त राहिली, तर दरवाढीची शक्यता आहे.

या वर्षी गव्हाचे उत्पादनही घटले असून, सरकारी खरेदीतही मोठी घट झाली आहे. पाच ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी ३१४.१४ लाख हेक्टरच्या तुलनेत २७२.३० लाख हेक्टरवर भातपीक झाले आहे. पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा आणि तेलंगण या भात उत्पादक राज्यांमध्ये लागवडीचे क्षेत्र घटले आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार पश्चिम उत्तर प्रदेशात आठ ऑगस्टपासून ३६ टक्के कमी पाऊस झाला आहे, तर पूर्व उत्तर प्रदेशात या पावसाळ्यात आतापर्यंत ४३ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे बिहारमध्ये ३८ टक्के आणि झारखंडमध्ये ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे. पश्चिम बंगालच्या गंगेलगतच्या भागात ४६ टक्के कमी पाऊस झाला आहे.

भारत सर्वांत मोठा निर्यातदार

– तांदूळ निर्यात करणारा भारत हा जगातील सर्वांत मोठा देश

– जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा ४० टक्के

– देशात तांदूळ उत्पादनावर परिमाम झाला, तर त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या व्यापारावर होणार

– गेल्या पीक हंगामात (जुलै-जून) देशात १२.९६६ कोटी टन तांदळाचे उत्पादन

– २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारतातून २.१२ कोटी टन तांदूळ निर्यात

– यावर्षी १ जुलैपर्यंतच्या उपलब्ध आकडेवाकरीनुसार, केंद्राकडे ४.७ कोटी टन तांदळाचा साठा

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम

– रशिया-युक्रेनच्या युद्धानंतर जगभरात अन्नटंचाईचे संकट

– भारतात गव्हाचे भाव वाढल्यावर किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना

– सरकारने यावर्षी १३ मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली

– मात्र, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, कतार, बांग्लादेश, भूतान, व्हिएतनाम, येमेन आणि मलेशिया या देशांमध्ये गहू पाठवला

तांदळाची स्थिती

– देशातील तांदूळ लागवडीखालील क्षेत्र ः २७४.३० लाख हेक्टर

– गेल्या वर्षी असलेले तांदळाचे क्षेत्र ः ३१४.१४ लाख हेक्टर

– या राज्यांत क्षेत्र घटले ः पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा आणि तेलंगण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *